Thursday, 6 September 2018

गंजिफा


  भारतीय हस्तकले मध्ये लघुचित्र किव्हा Miniature Painting ज्याला आपण म्हणतो त्यातील बैठ्या खेळाचे एक स्वरूप म्हणजे गंजिफा. कल्पकतेने व कलाकुसरीने एखाद्या कागदावर केलेले सुंदर नक्षीकाम ह्या खेळाची ओळख. गंजिफा म्हणजे पत्त्या चा जुना प्रकार, गोल व आयताकृती आकाराचे हे पत्ते विविध रंग वापरून वेगवेगळी चित्र कडून  हाताने तयार केले जातात. अभ्यासकांच्या मते गंजिफा हा खेळ पेर्शिअन आहे तर काही जण त्याचा संबंध ओरिसा मध्ये प्रचलित असलेला गंजपा ह्या शब्दाशी लावतात. गंज म्हणजे आवाज करणे (ह्या खेळ मध्ये आपल्या विजयाची किव्हा प्रतिस्पर्ध्याच्या पराजयाचा जोराने उदघोष करतात).

गंजिफा ह्या खेळाचे दोन प्रकार आहेत हिंदु गंजिफा आणि मोघल गंजिफा. हिंदू गंजिफा मध्ये दशावतारी गंजिफा, नवग्रह गंजिफा, नवदुर्ग गंजिफा, रामायण गंजिफा व चामुंडेश्वरी छद असे प्रमुख प्रकार पहायला मिळतात. चंगकांचन गंजिफा हा मोघल गंजिफा चा प्रकार आहे. कागद, कापड व चामडे वापरून हे गंजिफा तयार केले जातात. हस्तकलेचा सुंदर नमुना गंजिफा ह्या खेळामध्ये पाहायला मिळतो. बारीक नक्षीकाम, सुंदर वेलबुट्ट्या त्या मध्ये देवी देवतांची चित्र रंगवलेली असतात, काही गंजिफा मध्ये सोन्या चांदीचे लेप देखील वापरला जातो.

ह्या गंजिफा प्रकारामध्ये प्रमुख व प्रचलित प्रकार म्हणजे दशावतारी गंजिफा. देवीदेवतांची नावे सतत मुखात राहावी किव्हा त्यांचे नामस्मरण व्हावे हाच त्या मागचा उद्देश होता. एकी कडे जिथे मोघल गंजिफा हे जास्त करून जुगार खेळण्यास त्या काळात वापरले जात तर दुसरी कडे दशावतारी गंजिफा अध्यात्माचे एक साधन म्हणून खेळण्यात येई. परकीय सत्तेचा जोर कायम असताना त्यांच्या रूढी परंपरा आपल्या वर हावी होऊ नयेत म्हणून ह्या खेळामध्ये देवी देवतांची चित्रे टाकून आपली संस्कृती टिकवण्याचा केलेला हा प्रयत्न. 

दशावतारी गंजिफा:

दशावतारी गंजिफा हा भगवान विष्णूचे दहा अवतार दाखवणारा गंजिफा. ह्या मध्ये विष्णूचे दहा अवतार वापरूण दहा गट बनवलेले असतात. प्रत्येक गटात १२ पत्ते असतात. राजा, वजीर व एक्का ते दहेली अशी पाने असतात. एक्का ते दहेली ह्या पानांवर अनुक्रमे प्रत्येक अवताराची आयुधे अंकस्वरूप मूल्यात दर्शवलेली असतात. प्रत्येक अवतारला वेगवेगळा रंग असतो.

मत्स्यवतार – लाल रंग , चिन्ह – मासा
कूर्म – लाल रंग, चिन्ह – कासव
वराह  – पिवळा, चिन्ह – डुक्कर
नरसिंह – हिरवा, चिन्ह – सिंह
वामन – हिरवा, चिन्ह – छत्र
परशुराम  – तपकिरी , चिन्ह – परशु
राम – पिवळा , चिन्ह – धनुष्यबाण
कृष्ण – तपकिरी , चिन्ह – गाय
बुद्ध  – काळा  , चिन्ह – शंख
कल्की  – काळा , चिन्ह –  घोडा किव्हा तलवार

राजा हा सिंहासनरूढ असतो तर वजीर अश्वारूढ असतो. हा खेळ तीन खेळाडूंमध्ये खेळला जातो व प्रत्येकाकडे ४० पाने असतात, दिवसास खेळताना राम अवताराने  सुरुवात करावी व रात्री खेळताना कृष्ण अवतार सुरु करावा. काही प्रमाणत पात्यांमधील ५, ३,२ सारखा हा खेळ खेळला जातो.
पेशव्यांच्या काळत नवग्रह गंजिफा तयार करण्यात आला होता असा उल्लेख काही संदर्भ सूचित आढळतो.

सावंतवाडी संस्थानाने ह्या खेळला एक नवसंजीवनी देत आज तागायद टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. श्रीमंत शिवरामराजे  भोसले ह्यांनी सन १९५९-६० साली ह्या खेळाचे जतन करण्याकरिता पुढाकार घेतला आणि त्याची निर्मिती सुरु केली. सावंतवाडी संस्थान चे खेमसावंत (तिसरे) ह्यांनी हस्तकलेला व त्यातील कलाकारांना आश्रय दिला व सर्वांना एकत्र करून गंजिफा व इतर हस्तकला प्रशिक्षण व निर्मिती केंद्राची सुरुवात केली. राजमाता सत्वशीला देवी भोसले हा सर्व कारभार पाहत आहेत. सावंतवाडी संस्थान ह्या गंजिफा खेळाचा उत्तम प्रकारे प्रसार करत आहेत. कोकणात हा खेळ सर्वत्र खेळत असत. हा खेळ ह्या भागात कधी आला ह्याचे संदर्भ माहित नाही पण भारतात काही ठिकाणी हा खेळ अजूनही खेळला जातो.

पु. ल देशपांडे ह्यांच्या व्यक्ती आणि वल्ली मधील अंतूबरवा ह्याचे वाक्य आठवलं “रे गोविंदभट टाकतोस काय दोन डाव, परांजप्या जागा आहेस का झाला तुझा अजगर” अश्या आरोळ्या ठोकीत अंतुबरवा पत्त्यातील बिडू शोधत असताना पु लं देशपांडे ह्यांनी आपल्या कथाकथनामधून साकारलेली ही व्यक्तीरेखी चटकन डोळ्यासमोर उभी राहते. त्या मधील गंजिफा हा खेळ शिकण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न व सर्व प्रसंग डोळ्या समोरून जातात.
 खरच कोकणातील ती पिढी त्यांच्या चालीरीती इतिहास जमा होत गेल्या मग ह्या खेळाचे ते काय. गंजिफा असाच एक खेळ तो ही कुठल्या तरी काचेच्या पेटीत बंद झाला व खेळा ऐवजी शोभेची वस्तू बनून राहिला.





Monday, 5 February 2018

खेळांची संतवाणी


खेळांची संतवाणी 
अब्बक, तुब्बक, तीक्कम, तुल, चौबक, पंचक विट्टी गुल असे कोणी म्हटले कि लागेचच आपल्याला ‘विटीदांडू’ हा मराठी चित्रपट आठवतो. ह्या चित्रपटात एक सुंदर वाक्य आलं आहे “जर आपण विटीदांडू हा खेळ टिकवला असता तर जागतिक स्थरावर ह्याचे सामने झाले असते आणि क्रिकेट ऐवजी आपण हा खेळ खेळत असलो असतो पण”.... पण खरच काळ बदलत गेला आणि हे सर्व खेळ मागे पडत गेले. केवळ ह्या खेळामुळे अपघात होतात म्हणून हा खेळ बाजूला पडला. अपघात कुठल्या खेळात होत नाही? पाश्चात्य लोकांचे अनुकरण करणारे आपण आपल्या सांस्कृतिक परंपरा वाढीस का न्हेऊ शकलो नाही हा विचार पडतो. संत वांगमयात ज्या खेळाचे वारंवार उल्लेख येतात त्या मध्ये एक म्हणजे संत तुकाराम महाराज ते म्हणतात

बाळपणें ऐसीं वरुषें गेलीं बारा । खेळतां या पोरा नानामतें ॥
विटू दांडू चेंडू लगोऱ्या वाघोडीं । चंपे पेंड खडी एकीबेकी ॥ध्रु.॥
हमामा हुंबरी पकव्याच्या बारे । खेळे जंगीभोंवरे चुंबाचुंबी ॥
सेलडेरा आणि निसरभोंवडी । उचली बाले धोंडी अंगबळें ॥ 
तुका ह्मणे ऐसें बाळपण गेलें । मग तारुण्य आलें गर्वमूळ ॥
अर्थ : तुकोबाराय ऊपदेशपर लिहीतांना म्हणतात की तुमची बालपणीची बारा वर्षे सहजच अशी विवीध खेळ खेळता खेळताच गेली.बालपणी कोणते खेळ खेळले जात होते त्याची यादीच तुकोबाराय देतात.विटी दांडू,चेंडू लगोरी,चंपे पेंड,एकीबेकी या बरोबरच हमामा, हुंबरी तसेच भोवरे सुद्धा खेळले जायचे. पुढे खेळाची माहीती देतांना तुकोबाराय लिहीतात की सेलडेरा आणि निसरभोवंडी म्हणजेच घसरगुंडी एकमेकांना ऊचलण्याचा खेळ सुद्धा खेळला जायचा.
तुकोबांच्या बालपणीच्या ह्या खेळाचा उल्लेख त्यांच्या अभंगात स्पष्ट दिसतो आणि त्याच बरोबर इतर खेळांचा देखील उल्लेख ह्यात आहे. अभंगातील शेवटची ओळ वाचली तर कळतं कि जे बालपण आनंदात खेळण्यात, बागडण्यात घालवलं तेच सर्व तारुण्य आल्यावर गर्वामुळे वाया गेलं.
दुसऱ्या एका अभंगात ते म्हणतात
माग विटूदांडू । आणीक कांही खेळ मांडूं ॥१॥
बहु अंगा आले डाव । स्थिर नाहीं कोठें पाव ॥ध्रु.॥
कोली हाणे टोला । झेली तेणें तो गोविला ॥२॥
एकमेकां हाका मारी । सेल जाळी एक धरी ॥३॥
राजी आलें नांव । फेरा न चुकेचि धांव ॥४॥
पुढें एक पाटी । एक एकें दोघां आटी ॥५॥
एका सोस पोटीं । एक धांवे हात पिटी ॥६॥
तुका म्हणे आतां । खेळ मोडावा परता ॥७॥

अर्थ : गड़यानो, हा विटीदांडूचा खेळ ज़रा बाजूला ठेवून आपण दूसरा एखादा खेळ खेळु. पुष्कळ डाव आंगावर आले. या प्रपंचरूपी खेळात आपले पाय कुठेच् स्तिर राहिले नाही (वधूपितारूपि) एक गड़ी (कन्यारूपी) वीटी कोलून तिला (लग्नरूपि) टोला मारतो. दुसरा (जावाईरुपि) गड़ी ती झेलतो, त्याने ती वीटी झेलली आहे, तोच या डावात गुंततो, डावात आलेल्या लग्न झालेल्या त्या स्त्रीसह सारे एकमेकांना हका मारतात. कधी हृदयाला सलनारे बोल बोलतात. एखादा गड़ी पळून जायला लागल्यावर त्याला पकडून ठेवतात एकदाकी या प्रपंचिक गड्यांच्या रांगेत नाव लागले की जन्म-मृत्यु च्या फेऱ्या आणि संपत्तिचि हाव कधीच चुकत नाही या रांगेत मुलगा, नातू, पंतू हे पुढे असतात व बाप, आजोबा, पंजोबा हे गड़ी मागे असतात. एकमेकांच्या पालनपोषणाचा दोघानाहि प्रयत्न करत राहावा लागतो. विटीदांडूच्या या खेळाविषयी काहींच्या मनात फार हाव्यास असतो. त्यामुळे धनलोभाकडे धाव घेतात. त्यातून थोडाफार फायदा झाला की आनंदाने टाळ्या पिटतात. तुकाराम महाराज म्हणतात, आता हां खेळ सोडा आणि दुसरा खेळ मांडा.संसाररुपी प्रपंचाला विटीदांडूची दिलेली उपमा सुंदर प्रकारे मांडली आहे.
जनाबाईंच्या अभंगातसुद्धा एके ठिकाणी एका बैठ्या खेळाचा उल्लेख येतो त्या म्हणतात

मांडियेला खेळ । रंग बुद्धिबळ ॥१॥
कैंचा शह आला । प्याद्याखाली फजीं आला ॥२॥
शहबाजू आली । जनी म्हणे मात केली ॥३॥

रंग बुद्धिबळ म्हणजे चदुरंग किव्हा चतुरंग व कालांतराने अपभ्रंश झालेला शतरंज हा खेळ ज्या मध्ये प्यादा हा उंटाला मारतो आणि शह झालेली बाजू मांडलेली दिसते.
टिपऱ्या हा देखील एक प्राचीन खेळ आहे भगवान श्री कृष्ण देखील गोपगोपिसोबत रासलीलेत टिपऱ्या खेळल्याचे वर्णन आढळतात. टिपरी ह्या खेळाविषयी तुकोबारायांच्या गाथेत सहा विस्तृत अभंग आहेत.
खेळसी टिपर्‍या घाईं रे । वाचे हरिनाम गाई रे । 

टिपरीस टिपरी चुकुं जातां भाई । पडसी यमाच्या घाई रे ॥१॥ 
     
विटीदांडू असो किव्हा इतर कुठला हि खेळ असो, लहानपणी खेळलेल्या ह्या खेळाचे प्रत्येकाशी अगदी जिव्हाळ्याचे नाते आहे. एका विद्यमान सिव्हील अभित्यंता ह्यांनी त्यांच्या बालपणीची सांगितलेली गोष्ट आठवते ते म्हणत होते कि “आजही अमुक एक अंतर जर नजरेने मोजायचे असेल तर ते किती फुटाचे आहे ते मी अचूक सांगू शकतो आणि अशी नजर केवळ विटीदांडू हा खेळ देऊ शकतो”. खरंच इतक्या प्रगत झालेल्या ह्या सर्व गोष्टी कुठे तरी जुन्या खेळांशी संबंधित आहे तेव्हा त्या सर्व खेळाचा आपल्यावर होणारे सकारात्मक परिणाम पाहून अभिमान वाटतो. आपण हे सर्व खेळ खेळलो आहोत आणि संत परंपरेने चालत आलेला हा वारसा आपण टिकवायला हवा. आता खरी गरज आहे ते फक्त पुढच्या पिढीला हा वारसा सुपूर्द करण्याची .           

आट्यापाट्या


आट्यापाट्या

शारीरिक व्यायाम ज्या मध्ये धावणे हा एक महत्वाचा घटक मानला जातो आणि ज्या खेळां मध्ये ह्या धावण्याचा समावेश होतो तो म्हणजे आट्यापाट्या. मुलांचे शारीरिक स्वास्थ्य अधिक बळकट करण्यासाठी व्यायाम हा हवाच आणि आट्यापाट्या ह्या खेळांमध्ये धावणे, हुलकावणी देणे, अडवणे ह्या मुळे सर्व शारीरक हालचाली होतात. आट्यापाट्या हा मैदानी खेळ असून एका संघातील खेळाडूंनी दुसऱ्या संघातील खेळाडूंना ठराविक जागेत (पट्टीत) अडविणे व अडवलेल्या खेळाडूंनी हुलकावणी देऊन निसटणे अशी रुपरेषा असलेला हा महाराष्ट्रातील खेळ आहे. पूर्वी ह्या खेळासाठी सर्वसामान्य नियम नव्हते. पुण्याच्या डेक्कन जिमखान्याने ह्या खेळा मध्ये सुधारणा करत १९१४ साली अधिकृत व नियमबद्ध अखिल भारतीय सामने सुरु केले. १९१८ मध्ये बडोदा येथील हिंदविजय जिमखान्याने देखील काही वेगळे नियम लागू केले. अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळाने ह्या खेळला आधुनिक, आकर्षक, संघटीत अ शिस्तबद्ध स्वरूप दिले. आता ह्या नियमानुसारच हा खेळ सर्वत्र खेळला जातो. सूर-पाती, लोन-पाती, दर्या-बंध, सारागरी, सारामणी, तिल्ली, उप्पीनाट, उप्पू-पत्ती, चौपाल-पाती, पंचवटी, चिक्का आदी विविध नावांनी हा खेळ खेळला जातो. आदिवासी भागात ह्या खेळला ‘लाभ’ म्हणून संबोधले जाते. तामिळनाडू राज्यातील पुरातन तामिळ साहित्यात या खेळाचे किलीथाटूअसे नमूद केलेले आहे अजूनही तिथे शेतामध्ये हा खेळ खेळला जातो. संत तुकाराम ह्यांच्या काळात हा खेळ प्रचलित होता असे त्यांनी केलेल्या त्यांच्या अभंगातून व्यतीत होतं.

आट्यापाट्यांचे क्रीडांगण नियमानुसार सुरपाटी व इतर नऊ पाट्यांत विभागलेले असतात. खेळ जिथून सुरु होतो त्या पाटीला कपाळपाटी असे म्हणतात. शेवटच्या पाटीला लोणपाटी असे म्हणतात. सर्व पाट्यांना दुभागून जाणाऱ्या पाटीस सुरपाटी किवाह मृदुंगपाटी असे म्हणतात. खेळाडूंचे दोन संघ असतात व त्यात प्रत्येकी नाऊ खेळाडू असतात. खेळीत खेळणारे (लोणवाले) कपाळपाटीकडून लोणपाटीकडे खेळत जाऊन लोणपाटीकडून उलटून कपाळपाटीकडे खेळत येतात. त्यांनी कपाळपाटी ओलांडली, की लोण होते. प्रतिपक्षातील खेळाडू (पाटीवाले किंवा पाट्या धरणारे) पाट्यांवर उभे राहून लोणवाल्यांना अटकाव करून लोण न व्हावे असा प्रयत्न करतात. लोणांवरच डावाचा निर्णय अवलंबून असतो. सूरवाल्याला प्रतिस्पर्ध्यास चोहोंकडून कोठेही मारता येते; पण पाटी धरणाऱ्या खेळाडूस मात्र प्रतिस्पर्धी मागच्या घरात गेल्यानंतर मारता येत नाही.

१९४८ मध्ये या स्पर्धा फार मोठय़ा प्रमाणात पार पडल्या. मात्र त्यानंतर म्हणजे १९४८ नंतर अखिल भारतीय स्तरावर या खेळाला लोकप्रियता किंवा मान्यता मिळवून देण्यासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत. याचा परिणाम असा झाला की अतिशय वेगवान, आकर्षक आणि चुरशीचा असा हा खेळ स्पर्धा जगाच्या व्यासपीठावर मागे पडला. अजूनही अगदी मोजक्या ठिकाणी लहान लहान मंडळे या खेळाचे सामने आयोजित करतात. इतक्या मर्यादेपर्यंत हा खेळ मागे पडला.

आटय़ापाटय़ा खेळातील काही नामवंत खेळाडू तसेच या खेळाविषयी आस्था असलेले क्रीडाप्रेमी एकत्र आलेया खेळाचे पुनरुज्जीवन करून त्याला जागतिक पातळीवर मान्यता मिळवून देण्याच्या हेतूने त्यांनी १९८२ मध्ये दिल्ली येथे सभा घेतली. याचा परिणाम म्हणून १९८२ मध्ये पहिल्यांदा आशियाई खेळांदरम्यान आटय़ापाटय़ा फेडरेशन ऑफ इंडियाची स्थापना झाली. तब्बल ३४ वर्षांच्या खंडानंतर या खेळाच्या नियमावलीत सुधारणा करण्यात आली आणि १९८२ मध्ये पहिली राष्ट्रीय आटय़ापाटय़ा स्पर्धा झाली. आटय़ापाटय़ा फेडरेशन ऑफ इंडियाला आटय़ापाटय़ा खेळाचे मूळ इतर राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशात आढळले. दिल्ली, हरयाणा, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, मणिपूर, जम्मू-काश्मीर, ओरिसा, केरळ, गोवा आणि इतर अनेक ठिकाणी हा खेळ रुजविण्यास मदतच झाली.
हा खेळ मनोरंजक, भरपूर व्यायाम करून देणारा व बिनखर्ची आहे. वैयक्तिक चापल्य व सांघिक कौशल्य यांची कसोटी यात लागते. तसेच शारीरिक व मानसिक अनुसंधानाचेही शिक्षण ह्या खेळामुळे मिळते.

संदर्भ : मराठी विश्वकोश ० धारूरकर. य. ज, लोकसत्ता नाशिक वृतांत 



  

Monday, 25 September 2017

मोबाईल : एक संवाद

ब्लूव्हेल ह्या online खेळाची चर्चा चालू असताना तंत्रज्ञानाचा अतिरेक असे ताशेरे मारले जातात. ग्याझेट आणि त्याबबतची वाढत चाललेली व्यसनाधीनता हि इतर व्यसनांपेक्षा जास्त हानिकारक ठरत आहे. माणसाने तंत्रज्ञान बनवलं पण हेच तंत्रज्ञान प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. प्रत्येक प्रगतीच्या मागचे हानिकारक पडसात कालांतराने कळायला लागतात सुरवातीला सर्व गोष्टी हव्याहव्याश्या वाटतात नंतर त्याच्या अतिरेकामुळे त्या नकोश्या वाटायला लागतात. तसच काहीसं ह्या मोबाईल च्या बाबतीत झालं आहे, जसजशी त्यामध्ये प्रगती होत गेली तसे त्याचे दुष्परिणाम दिसायला लागले. योग्य त्या वापरा ऐवजी इतर निरुपयोगी वापर जास्त प्रमाणत होऊ लागला. संपर्कासाठीचं उत्तम उपकरण असूनही एक अवघड जागेचं दुखणं होऊन बसलं आहे. जगभरातील सर्व माहिती एका क्लिक वर मिळायला लागली आहे हे खरं पण जवळची माणसं लांब जाऊ लागली आहे. मोबाईल एक उपकरण न राहता एक जीवानावाश्यक वस्तूं ह्यांच्या पंगतीत जाऊन बसला आहे. ह्याला जबाबदार कोण ???? तर आपण...

ग्याझेट चा अति वापर आणि त्याचे मानवी जीवनावर आणि मनावर होत असलेले परिमाण पाहता आपण प्रगती पेक्षा अधोगतीचा मार्ग अवलंबलेला दिसतो. मोबाईल वरील खेळ हा एक त्यामधील मुख्य घटक आहे. नजर खिळवून ठेवणारे हजारो online games आज मोबाईल वर मिळतात. वास्तव आणि अवास्तव ह्या मधील फरक त्यामुळे नाहीसा झालेला दिसतो. एका वेगळ्या स्वप्नमय जगात नवीन पिढी वावराताना दिसते ज्यामुळे खऱ्या व सच्च्या जगाशी त्याचं नातं तुटलेलं वाटतं. ब्लूव्हेल गेम खेळ तयार करणाऱ्यांचं इथेच फावतं, तुटत चाललेले संवाद ह्याला कारणीभूत आहेत. बऱ्याच वेळेच आपण पाहतो ट्रेन किव्हा बस मध्ये प्रवास करताना ५०% लोकं मोबाईल वर काही न काही तरी करत असतात. कोणाला कोणाशी बोलायला वेळ नाही. कधी कधी बाजूला बसून whatsapp वर चर्चा चालतात आणि कोणाचा चुकून धक्का लागला तर वादच सुरु होतो मग संवाद तर दूरच. हाच संवाद पुन्हा साधायचा असेल तर आपल्याला आधीच्या काळात डोकवावे लागेल. ज्या कळात लोकं अल्पसंतुष्ट असूनही सुखी होती कुठलेही दडपण नव्हतं आणि ह्या सर्वांची बीजं त्यांच्या बालपणात रुजली गेली होती. त्यांचा IQ (Intelligent Quotient) बरोबरच EQ (Emotional Quotient) हि तितकाच चांगला असे. त्यांचे बालपणीचे खेळ हे आजच्या online खेळा पेक्षा कित्येक पटीने चांगले होते कारण त्या खेळांमध्ये संवाद असे. आज कित्येकांनी कॅरम खेळणं देखील सोडलं आहे जे प्रत्येक घरात खेळत असत. जर आपण बदलायचे ठरवले तर बदल नक्कीच घडू शकतो फक्त आता एक पाऊल पुढे न टाकता मागे टाकायला हवे.   

ब्लूव्हेल हा खेळ निम्मित मात्र आहे खरी गरज आहे ती म्हणजे ह्या बाबतचं प्रबोदन होण्याची. खेळ काय येतच राहतील पण ह्या बाबत आपण सर्व सतर्क राहिलो तरच आपण तरले जाऊ. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक न करता योग्यत्या ठिकाणी थांबणं गरजेचं आहे. तांत्रिक विकास गरजेचा आहे पण तो ही मनुष्याची हानी न होऊ देता म्हणूनच गरजेचा आहे तो एक संवाद.   

Friday, 23 June 2017

पच्चीसी, चौसर

पच्चीसी, चौसर 

आपल्याला कोणी विचारलं आपला राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय प्राणी, राष्ट्रीय फुल कोणता तर आपण चटकन उत्तर देतो. पण आपला राष्ट्रीय बैठा खेळ कोणता ? असं कोणी विचारलं तर मी त्यांना उत्तर देईन “चौसर”, “चौपट” किव्हा “पच्चीसी”. भारतीय इतिहासात ज्या खेळाने हे मानाचे स्थान पटकावले तो हा खेळ भारतात फार पूर्वी पसून प्रसिद्ध आहे. मंदिराच्या शिल्पातून, चित्रातून आणि विविध संदर्भात “चौसर” अथवा “पच्चीसी” ह्या खेळाचे उल्लेख आढळतात. ह्या खेळाचे ठोस संदर्भ १५ व्या व १६ व्या शतकात जरी सापडत असले तरी हा खेळ पुराण काळापासून प्रसिद्ध आहे.
वेरूळ येथील मंदिरातील शिल्प 

देवी देवतांच्या भक्तीकथा आपल्याला ज्ञात आहेतच, महादेव शंकर व देवी पार्वती ह्यांचा हा आवडता खेळ मानला जातो तसे पुरावे प्राचीन मंदिराच्या शिल्पात आपल्याला पाहायला मिळतात. असंच एक शिल्प वेरूळ (ELLORA) येथील शिवमंदिरात आपल्याला पाहायला मिळतं. विजयनगर साम्राज्यातील हम्पी ह्या ठिकाणी व कर्नाटकातील विविध मंदिरात ह्या खेळाचे कोरीव अवशेष पाहायला मिळतात.

चौसर, चौपट, पच्चीसी
पच्चीसी किव्हा चौसर हा खेळ चार जणांमध्ये खेळला जातो. पटावर प्रत्येक प्रतिस्पर्ध्याची चार प्यादी मांडलेली असतात. लाल, हिरवा, पिवळा आणि कला अशी एकूण १६ प्यादी असतात. मधील चौकोनात लाकडी पासे ठेवलेले असतात त्या मध्ये १, ३, ४ व ६ असे गुण असतात. प्रत्येक प्रतिस्पर्धी आपली प्यादी पडलेल्या गुणांवर चालवतो आणि शेवटच्या घरात जाण्याचा प्रयत्न करतो. हे करत असताना प्रतिस्पर्ध्याच्या प्याद्यला छेद द्यायचा असते. नाशिब आणि नियोजन कौशल्याने परिपूर्ण असलेल्या ह्या खेळात डावपेच खेळत हा खेळ जिंकायचा असतो.

ह्या खेळाचे नियम प्रांता-प्रांतात, जागो-जागी बदलताना दिसतात. भारताप्रमाणे इतर देशात देखील हा खेळ प्रसिद्ध आहे. भारत ह्या खेळचा जनक असून हा खेळ चीन मध्ये “शुपु” ह्या नावाने प्रसिद्ध आहे. कोरिया मध्ये हा खेळ गोलाकार पटावर खेळला जातो व त्याला “नेआऊट” असे म्हणतात.चीनच्या मते हा खेळ तिसऱ्या शतकात चीन मधून कोरिया मध्ये गेला पण भारतात ह्याचे अस्तित्व त्या ही अगोदरचे आहे ह्याचा अर्थ “शुपु” व “नेआऊट” हे खेळ भारतामधून तिथे गेले. सन १८६० मध्ये हा खेळ इंग्लंड व अमेरिकेत दाखल झाला. बदल करण्यात तरबेज असलेले इंग्रज ह्यांनी नवीन आवृती काढत त्याचे “लुडो” असे नामकरण केले. ह्यातील दोन पासे काडून त्यात एकच पासा खेळण्यासाठी वपरला, त्यावर १ ते ६ हे गुण आहेत, त्याला आपण DICE असे म्हणतो.

भारतावर कित्येक राजवटींनी राज्य केलं ते करत असताना येथील संस्कृती आत्मसात केली व काही मध्ये बदल करत ती टिकवण्याचा प्रयत्न देखील केला. 


फतहपूर सिक्री - दिवान-ए-खास मधील पच्चीसी 
अश्याच मुघल राजवटीत ह्या खेळाचे भव्य स्वरूप आपल्याला पाहायला मिळते. आग्रा येथील फतहपूर सिक्री मधील दिवान-ए-खास मध्ये आपल्याला हा खेळ पाहायला मिळतो. अकबर बादशाह च्या दरबारात हा खेळ दिमाखात खेळला जात असे. लाल आणि सफेद दगडांनी बनवलेला हा सर्वात मोठा पट ६६.२९ x ४६.९३ चौ.मीटर चा आहे. त्याच्या मधोमध १.४७ x १.२९ मीटर्स चा दगडी चौथरा आहे ज्यावर पासे टाकले जात असत.रंगीत कपडे परिधान करून दरबारातील गुलामांना त्यावर प्यादे म्हणूण वापरलं जाई. “अकबरनामा” प्रमाणे हा खेळ उच्च उदिष्टांचा पाठपुरावा करण्यासाठी खेळला जात असे प्रतिस्पर्ध्याची प्रतिभा तो ह्यातून तपासात असे. कधी कधी हा खेळ तीन तीन महिने चालत असे. काळानरूप ह्या खेळात बदल होत गेले कधी पट, कधी प्यादे तर कधी पासे ह्याची रूपे बदलत गेली पण खेळाचा गुणधर्म तोच राहीला. आजही काही ठिकाणी हा खेळ दिवाळीत खेळला जातो कुठे मनोरंजनासाठी तर कधी जुगारासाठी.

माझ्या एका मित्राने सांगितलेली एक गोष्ट आठवते. त्यांच्या गावातील शंकर मंदिरात रोज रात्री देवाच्या गाभार्यात चौपट ठेवला जातो त्यावर पासे ठेऊन, प्यादे मांडले जातत त्या समोर देवी पार्वतीची मूर्ती ठेवली जाते आणि मंदिराचे दार बंद केले जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी दार उघड्ताच त्या पटावरील पासे फिरलेले असतात, प्याद्यांची चाल चाललेली असते जणू काही रात्रभर शंकर व देवी पार्वती ह्या दोघां मध्ये हा खेळ रंगलेला आहे. सत्य काय ते माहित नाही पण कुठली तरी अदृश शक्ती असावी जी ह्या न त्या रूपाने ह्या खेळाचे अस्तित्व व पावित्र्य टिकवण्याच्या प्रयत्नात आहे आणि आपल्याला हि ते दर्शवत आहे.


         
     

          

Thursday, 17 November 2016

चतुरंग

चतुरंग 

साजी चतुरंग वीर रंगमे तुरंग चढी.....ह्या अलंकारबद्ध ओळीत चतुरंग म्हणजे चतुरंग सैन्य ज्या मध्ये पायदळ, घोडदळ, उंट आणि हत्ती आहेत आणि हे सैन्य घेऊन एक राजा लढाईस निघाला आहे. हेच प्रतीकात्मक चतुरंग सैन्य एका पटावर मंडलं तर त्याचा एक पुरातन खेळ होतो तो म्हणजे “चतुरंगा”.

८ X ८ च्या चौरस बुद्धिबळा सारख्या पटावर खेळला जाणारा हा खेळ दिसायला जरी आजच्या युगातील बुद्धीबळा सारखं असला तरी ह्या खेळाचे नियम वेगळे आहेत. हा खेळ दोन जणां मध्ये खेळण्या ऐवजी चौघांमध्ये खेळला जातो. जोडीने खेळला जाणारा हा खेळ सुमारे ३९०० वर्ष जुना आहे असे काही दंतकथा मधून निष्कर्ष काढला जातो तसेच ह्या खेळाचा उल्लेख ‘भविष्य पुराण’ ह्या ग्रंथात आढळतो. भारतात ह्या खेळाचे अस्तित्व पूर्णपणे संपुष्टात आले आहे. एका दंतकथे नुसार हा खेळ मंदोदरी म्हणजेच लंकाधीश रावण ह्यांची भार्या ह्यांनी बनवला आहे असे मानले जाते. भविष्य पुराणातील एका सूची वरून व्यास ऋषी ह्यांनी ह्या खेळाचे वर्णन करताना सूर्याची उपमा देऊन लाल, हिरवा, पिवळा आणि काळ्या हे प्रतिस्पर्ध्यांचे रंग म्हणून वापरलेले आहेत.

राजा, हत्ती आणि घोडा हे समान्य बुद्धीबळा सारखे चाल करतात. उंट मात्र पटावरील कुठल्याही सैन्यावरून उडी मारू शकतो. राजा, हत्ती आणि घोडा हे एकमेकांना व उंट आणि प्याद्याला चीत करू शकतात. पण ह्या उलट उंट आणि प्यादे हे एकमेकांशिवाय दुसऱ्या कोणालाही चीत करू शकत नाही. हा खेळ पासे (Dice) वापरून खेळला जातो त्याला “डल्ला” असे देखील म्हणतात. डल्ला च्या चारी बाजूस १, ३, ४ आणि ६ टिंब असतात. एक अंक पडले तर उंट चालतो, तीन असतील तर घोडा चालतो, चार असतील तर हत्ती चल करतो आणि सहा अंक पडलेले असतील तर राजा किव्हा प्यादा चालतो. प्रतिस्पर्ध्याचे दोन्ही राजे जेव्हा मारले जातात तेव्हा खेळ संपतो. checkmate सारखे प्रकार ह्या खेळत होत नाही. आधुनिक बुद्धिबळाचा हा भारतीय खंडातील जुना प्रकार असून देश विदेशातील अभ्यासकांनी ह्या खेळाचा अभ्यास केला आहे. सर विल्यम जोन्स ह्यांनी ह्या खेळावर एक लेख १७८८ मध्ये प्रसिद्ध केला होता. चार बाजूनी खेळला जाणारा हा खेळ म्हणूनच कि काय “चारो खाणे चीत” हा वाक्यप्रचार रुजू झाला. भारताप्रमाणे इतर देशात म्हणजे इटली, जपान चीन मध्ये ह्याच chess चे विविध प्रकार पाहायला. LUDUS हा खेळ देखील बुद्धिबळाचा एक प्रकार आहे. बुद्धीला चालना देणारा डाव पेच शिकवणारा आणि नियोजन कौशल्य वाढवणारा हा खेळ कालानारूप बदलत गेला आणि अस्तित्व हरवून बसला.

चतुरंग...चदुरंग...शतरंग आणि शतरंज ही बदलत गेलेली नावे तर नाहीत ? हे कोडं काही सुटलेले नाही.                   

Friday, 11 November 2016

मंकला

मंकला

मंकला, वारी, सातगोल 

गणित म्हटलं की सर्वांच्याच डोक्यला आठ्या पडतात,विशेष करून एखादे पालक आपल्या पाल्याकडून पाढे पाठ करून घेत असतात तेव्हा. काही वेळेस स्वताला पाठ नसलेला पाढा जेव्हा आपल्या मुलाच्या तोडून वदवून घ्यायचा असतो तेव्हा तर भलतीच पंचाईत होते. पण आज कालची मुलं खूप शार्प आहेत तंत्रज्ञान विकसित आहेत त्यामुळे काळाच्या पुढे जाऊ इच्छितात, विविध प्रकारची उपकरणं हाताळतात. क्यालकुलेटर पासून कॉम्पुटर पर्यंत आणि मोबईल पासून टॅब पर्यंत सर्व उपकरणांशी हि मुले अवगत आहेत आणि ह्या मुळेच त्यांना गणित हा विषय काही अंशी सोप्पा झालेला दिसतो. आताच्या युगातील abacus हे देखील एक प्रचीन तंत्रज्ञान आहे जे शाळेत शिकवले जाते. पण खेळ आणि त्या मध्ये गणिताचा समावेश, ह्याचं एक उदाहरण दाखल एक बैठा खेळ आहे ज्यामध्ये गणितातील बेरीज वजाबाकीचा उपयोग करून खेळ खेळतात. वारी किव्हा मंकला हा खेळ अश्याच अंक मोजणी व बेरीज वजाबाकी म्हणजेच गणिताशी संबंधित आहे.

मंकला हा खेळ जगभरात सर्वत्र खेळला जातो विशेष करून आफ्रिकेत हा खेळ खूप प्रचलित आहे. सुमारे ३५०० वर्ष पूर्वीचे संदर्भ आणि अवशेष ईजिप्त मध्ये आढळलेले आहेत. पुरातन ईजिप्त मधील Luxor, Karnak ह्या वास्तूं मध्ये ह्या खेळाचे अवशेष पहायला मिळतात. कालांतराने ह्याचा प्रसार आफ्रिका पासून मध्य आशिया, दक्षिण आशिया खंडात झाला. बाराव्या शतका पर्यंत ह्या खेळाचे सुमारे २०० प्रकार अस्तित्वात होते असे काही संदर्भ सापडलेले आहेत. आफ्रिकेतील काही लोकं समुद्र मार्गाने ज्या ज्या ठिकाणी गेली त्या त्या ठिकाणी त्यांनी ह्या खेळाचा प्रसार केला. Thomas Hyde ह्यांनी १६९४ मधील त्यांच्या प्रवासवर्णनात आफ्रिका व आशिया खंडातील खेळ म्हणून ह्या खेळाचा उल्लेख केलेला आहे. Chicago येथे १८९४ मध्ये भरवलेल्या पुरातन वस्तू प्रदर्शना नंतर हा खेळ अमेरिकन लोकां मध्ये प्रसिद्ध झाला.

दुर्गराज रायगडावरील सापडलेला पट

भारत देशाने असेच काही खेळ आपलेसे केले. हा खेळ भारतात केव्हा रुजू झाला ह्याचा उल्लेख सापडत नाही,पण वेगवेगळ्या राज्यात ह्या खेळला वेगवेगळी नवे आहेत. अलीगुली माने, चिने माने, हरलु माने, पिचकी माने, गोटू गुणी, पलंगुजी ही दक्षिणेतील काही नावे. सातगोल, सातगोटी, गोगलगाय ही काही मराठी-हिंदी नावे. गुरुपल्यान हे ह्या खेळाचे कोंकणी नाव आहे.

मंकला हा खेळा मध्ये एका आयताकृती फळीवर समोरा समोर ७ असे १४ रकाने कोरलेले असून अश्या पटावर हा खेळ खेळला जातो. प्रत्येक रकान्यात पाच कवड्या असतात. प्रतिष्ठित लोकांकडे हाच खेळ धातू मध्ये नक्षीकाम करून बनवलेला असे. खेळा मधील पासे म्हणून कवडी, रंगीत दगड, कडधान्य, बिया अगदी रत्न देखील वापरली जात. काही जुन्या वास्तूंवर व गड किल्ल्यांवर ह्या खेळाचे अवशेष आजही पाहायला मिळतात. असेच काळ्या पाषाणावरील काही अवशेष आम्हाला दुर्गराज रायगाडावर पहायला मिळाले, त्याचे वास्तव्य तेथे केव्हा पासून आहे हे मात्र अनुमान लावता येत नाही...पण शोध चालू आहे. 

खेळ खेळायला सोपा आणि बुद्धीला चालना देणारा आहे. प्रतीस्पर्धी खेळाडूचे जास्तीत जस्त पासे कमवून हा खेळ जिंकता येतो. अंक मोजणीचा अचूक अंदाज लावत हा खेळ रंगत जातो. एकाग्रता वाढवून हा खेळ लहान मुलांमध्ये गणिता बद्दल गोडी निर्माण करण्यास मदत करतो.

मंकला हा पेरणी खेळ म्हणून देखील ओळखला जातो. खेळ खेळत असताना बिया पेरल्या सारखी क्रिया होते म्हणूनाच कि काय हा कुठल्याही जागी बसून जमिनीवर खड्डे करून तिथलेच दगड उचलून खेळता येतो. त्याच मातीतील कुठल्या ही वस्तूचा उपयोग करून एक सुंदर खेळ जन्म घेतो.

हेच तर वैशिष्ट्य आहे कि मातीशी नाते सांगणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत.... पण त्यासाठी मातीत हाथ घातला पाहिजे... आणि हेच कुठे तरी जमत नाही आहे...    

Thursday, 15 September 2016

बैठे खेळ आणि त्याचे महत्व


आपला भारत देश हा सांस्कृतिक आणि कलाकृतीक विविधतेने नटलेले देश आहे. ह्याच भारतात नवनवीन प्रयोग प्राचीन काळापासून होत आलेले आहेत असे ऐतिहासिक दाखले मिळतात. ह्याच प्रयोगातून साकार झालेले बैठे खेळ आणि त्याची काही वैशिष्ट्ये. प्रचीन भारतात बैठे खेळा मार्फत मनोरंजन होत असे हे जरी खरं असला तरी ह्या खेळांच्या साधनांचा उपयोग अध्यात्मिक शिक्षणासाठी होत असे 'मोक्षपट' हे त्याचे उत्तम उदाहरण होय. कालांतराने ह्याच साधनांचा उपयोग मानसिक आणि बौद्धिक विकास करण्यासाठी होऊ लागला.

भारतात ह्या बैठ्या खेळांचे महत्व पौराणिक कथां मधून सांगण्यात आलेलं आहे. रिगवेदातील १४ अध्याया मध्ये ‘अक्ष सुक्त’ ह्या अध्यायात 'पट' व त्यातील पास्यांचा उल्लेख आढळतो. अगदी महाभारतात ज्या खेळामुळे रणसंग्राम झाला तो खेळ म्हणजे 'पट' किव्हा 'पचिसी'. प्राचीन मंदिरावरील शिल्पात किव्हा शीलालेखात अश्या बर्याच बैठ्या खेळांचे संदर्भ सापडतात ह्या वरूनच आपण ह्या खेळांचे त्या काळातील महत्व जाणु शकतो. जिथे 'चदुरंग' आणि 'पचिसी' राजा महाराजांचा खेळ जाणला जायचा तिथेच 'बाघचाल' किव्हा 'चाल्ल्सआठ' हे खेळ सामान्य वर्गात प्रचलित होते.

ह्या बैठ्या खेळांची विविधता आणि त्या खेळांची वैशिष्ट्ये

मंकला, सातगोल, गोगलगाय – अंक मोजणी खेळ
चदुरंग – युद्धनीती डावपेच
पचिसी, चौकाबारा  – अध्ययन क्षमता
नावकंकारी – संरेखान खेळ
अडूहुली – डावपेच
मोक्षपट, वैकुन्ठ्पल्ली – अध्यात्मिक शिकवण


त्या काळात मनोरंजनाचे एक साधन असलेले बैठे खेळ हे अध्यात्मिक शिक्षणा बरोबर प्रत्येकाचे मानसिक व बौद्धिक सश्क्तीकरण करत असत. मंकला हा खेळ लहान मुलांमध्ये गणितातील अंक मोजणी सुधारू शकतो. इतर खेळ अध्ययन व बौद्धीक क्षमता वाढवू शकतात.

अल्झायमर आणि डीमेंशिया सारख्या मानसिक आजारावर हेच बैठे खेळ एक उपचार पद्धती म्हणून काम करतात. ह्या खेळा मुळे तुम्ही मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्रीय राहता. इंग्लंड मध्ये ह्याच बैठ्या खेळांना मानसिक उपचार पद्धती मध्ये मान्यता मिळालेली आहे. 

कळाच्या पडद्या आड लुप्त झालेले हे खेळ पुनर्जीवित करून प्रत्येकाने हे खेळायला हवे आणि तसं हि तासं तास टीवीचा रिमोट दाबत बसण्यापेक्षा हे बैठे खेळ खेळण्यास काय वाईट आहे. चला तर मग.....        

Wednesday, 20 July 2016

कवडी


नाही खर्चीली कवडी दमडी नाही वेचीला दामकिव्हा कवडी के मोलह्या मधील कवडी जे एके काळचं चलन म्हणून ओळखलं जायचं त्या बद्दल थोडसं. कवडी किव्हा संस्कृत मध्ये 'कपर्दिका' व इंग्रजीत COWRIE SHELLS हे समुद्रात सापडणारे एका प्रकारच्या गोगलगाईचे कवच. कवड्यांचा वापर नाण्याचा शोध लागण्यापूर्वी चलन म्हणून होत असे. १८ व्या शतकापर्यंत कवडी हे चलन जगभरात वापरात होतं मग तांब्यांच्या नाणी ह्यांनी  त्याची जागा घेतली. भारता मध्ये १ रुपया चा भाव २५६० कावडी असे. व्यापार उदीम करतना कवड्यांचा वापर सरस होत असे. मुख्यता परकीय चलन ह्या मध्ये होणारे बदल आणि जागतिक बाजारात होणारी उलाढाल ह्या मध्ये कवड्यांचे फार महत्व असे. 

कवड्यांचे ज्ञात असलेले प्रकार म्हणजे साधी कावडी, लक्ष्मी कवडी, विष्णू कवडी आणि राजा कावडी. राजा कावडी हि आकाराने इतर कवडी पेक्षा मोठी असते. तुळजापूर शहरात नवरात्र उत्सवाच्या वेळी कवड्यांच्‍या माळांची शंभरपेक्षा अधिक दुकाने थाटली जातात. अनेक आराधी, आराधिनी महिला कवड्यांच्या माळेचा साज घालताना दिसतात. कवड्यांमध्ये अंबुकी कवडी व येडाई कवडी असे दोन प्रकार देखील पाहायला मिळतात.

कवडी म्हणजे एके काळचे धन आणि इथून सुरु होतो ह्या कवड्यांचा बैठ्या खेळा मध्ये होणारा वापर. सारीपाट, चौपर, चतुरंग इत्यादी बैठ्या खेळा मध्ये कवड्यांचा वापर होत असे.

बैठ्या खेळा मध्ये कवडीच्या दानाचे नियम

कुठल्याही खेळाची सुरुवात दोन पक्षांमध्ये पट मांडून आपापल्या सोंगट्या निवडून करतात. सहा कवड्या हातातील मुठीत घेऊन खळखळून जमिनीवर पसरावयाच्या याला दान घेणे असे म्हणतात. मग पालथ्या किती व उताण्या किती पडल्या यावर किती गुण मिळाले हे पाहण्यात येत असे.

६ कवड्या पालथ्या असल्यास १२ गुण
१ कवडी उताणी व ५ कवड्या पालथ्या पडल्यास १० गुण
१ कवडी पालथी व ५ कवड्या उताण्या पडल्यास २५ गुण
२ कवड्या उताण्या व बाकीच्या ४ पालथ्या पडल्यास २ गुण
३ उताण्या व ३ पालथ्या पडल्यास ३ गुण
४ उताण्या व २ पालथ्या पडल्यांस ४ गुण

अश्या प्रकारे गुण मिळवून बैठे खेळ खेळले जात. दान टाकण्यासाठी अजून एक वस्तू वापरत असत ती म्हणजे पासे किव्हा DICE ज्याचा संदर्भ हरप्पण कळात सापडतो. कावडयांचे खेळ कालबाह्य झाले पण आजही कवड्याची माळ घालूनच अंबाबाई देवीचे भक्त परडी हातात घेऊन जोगवा गातात व दान मागतात.
  


Tuesday, 19 July 2016

मोक्षपट

प्राचीन भारतात बैठ्या खेळांचं महत्व आणि त्यांच्या पद्धती ह्याचा अभ्यास करत असताना प्रामुख्याने जो खेळ आपल्या समोर येतो तो म्हणजे मोक्षपट, मोक्षपटम किव्हा परम पदम. हा खेळ भारतात सुमारे १३ व्या शतकात बनवण्यात आला. ह्या खेळाचे जनक होते प्रसिद्ध कवी संत आणि भागवत धर्माचे प्रवर्तक संत ज्ञानदेव महाराज. अध्यात्म आणि तत्वज्ञानाविषयक विचार रुजवण्यासाठी त्यांनी ह्या खेळाची निर्मिती केली असे दिसून येते. ह्या खेळामध्ये शिडी ही आपल्या मधील गुणांद्वारे मिळालेल यश दर्शवते आणि साप हे आपल्या दुर्गुणां मुळे मिळालेली क्षती दर्शवते. आपण चांगलं काम केलं की चांगलं फळ मिळतं आणि वाईट वृत्ती मुळे आपल्या मध्ये प्रगती होत नाही ही शिकवण ह्या माध्यमातून देण्यात येत असे. मोक्षपटम खेळत असताना मोक्षप्राप्तीचा मार्ग सुलभ करून अनंतात विलीन होण्याचा मार्ग ह्यात दर्शवलेला दसतो.
  
कालांतराने ह्या खेळामध्ये बदल होत गेले तशी त्याची  नावे देखील बदलत गेली "ज्ञान चौपर" व "वैकुंठपल्ली" ह्या नावाने देखील हा ओळखला जातो. कपड्यावर बनवलेला हा खेळ कवडी आणि पासे ह्यांनी खेळला जाई. काळ बदलला आणि ह्या खेळाचं  महत्व संपुष्टात आलं. ब्रिटिश राजवटीत सुमरे १८९२ साली तो भारता बाहेर गेला आणि नव्या नावारूपाने आपल्या सर्वांसमोर आला तो म्हणजे Snakes and Ladder अर्थात साप शिडी आणि आता आपण त्याला ह्या नावाने ओळखतो. नवीन रूपात आपल्याला फक्त अंक मोजणी पहायला मिळते त्या मधील मूळ उद्देश बाजूला पडला आणि आपण ह्या खेळाला आता फक्त एक TIMEPASS  म्हणून पाहतो  इतकच.